१२ मेपासून निवडक रेल्वेगाड्या सामान्य प्रवासी वाहतुकीसाठी सुरू
फक्त ऑनलाईन तिकिट मिळणार
मुंबई : येत्या मंगळवारपासून १५ जाणाऱ्या आणि १५ येणाऱ्या निवडक रेल्वेगाड्या सामान्य प्रवासी वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे. या निवडक रेल्वेगाड्यांच्या तिकिटांसाठी उद्यापासून केवळ ॲानलाईन बुकिंग सुरू होणार असून, रेल्वे स्थानकावरील तिकीट काऊंटरवर तिकीट मिळणार नाही. म्हणजे तिकिटांचं केवळ IRCTC च्या वेबसाईटवर ॲानलाईन बुकिंग करता येणार आहे. त्यातही कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. प्रवाशांना तोंडाला मास्क लावणे बंधनकारक केले जाणार आहे.
दीड महिन्यानंतर रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. १२ मेपासून सुरू होणाऱ्या रेल्वे न्यू दिल्ली स्टेशन, आगरतला, होवराह, पाटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगलुरू, चैन्नई, थिरूअनंथपूरम, मडगांव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तावी या स्थानका दरम्यान चालणार आहेत.
परराज्यातील मजूर त्यांच्या राज्यात परतत आहेत तसेच महाराष्ट्रातले मजूर इतर राज्यातून येत आहेत. त्यांच्याकडे रेल्वे प्रवासाची रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत ही गोष्ट लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून तिकिटाचे शुल्क भरण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधीत जिल्हाधिकारी यांना त्यांच्या मागणीप्रमाणे ही रक्कम निधीतून वर्ग करण्यात येईल. या संदर्भातील शासन निर्णय आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन विभागाने काढला आहे.
आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर रेल्वेचं तिकिट मिळणार आहे. ही ऑनलाईन तिकिट विक्री असून ११ मे रोजी सायंकाळी चार वाजता सुरू होणार आहे. रेल्वे स्थानकावर तिकिट मिळणार नाही. कन्फर्म तिकिटधारकांसाठीच रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जाईल. तोंडाला मास्क लावण बंधनकारक असणार आहे. दरम्यान, प्रवासी किंवा लोकांनी कुठल्याही रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये, असं आवाहन भारतीय रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.